ST News : ओडिशा येथे झालेल्या रेल्वे अपघातामुळे रद्द करण्यात आलेला एसटीचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन बुधवारी दिमाखात पार पडला. एसटीचा ७५ वर्षांचा प्रवास प्रदीर्घ असून, एसटीला उभारी देण्यासाठी ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आणि महिलांना ५० टक्के सवलत हे क्रांतिकारी निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एसटी तोट्यात जाणार नाही, आता नफ्यात येणार, ही आपली सर्वांची जबाबदारी, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.
अविरत ७५ वर्षे प्रवाशांना एसटी बससेवा
नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात एसटीचा अमृतमहोत्सवी वर्धापनदिन सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. लवकरच एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता देण्याचा विचार केला जाईल, असे सूतोवाचही मुख्यमंत्र्यांनी केले. १ जून १९४८ रोजी एसटीची पहिली फेरी अहमदनगर-पुणे मार्गावर घावली. या घटनेला यंदा ७५ वर्ष पूर्ण झाली. आज एसटीच्या १६ हजार गाड्या रस्त्यावर धावत असून, इलेक्ट्रिक बसपर्यंत तिचा प्रवास पोहोचला आहे. एसटीचा संपूर्ण प्रवास उपस्थितांच्या डोळ्यांसमोर ठेवण्यात आला. अवघ्या काही बसेसनी सुरुवात केलेली एसटी आज सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची लालपरी बनली आहे. प्रतिदिन ५५ लाख प्रवासी ने-आण करत आहे. ऊन, वारा, पाऊस झेलत अविरत ७५ वर्षे प्रवाशांना एसटी बससेवा देत असल्याचे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.
‘एसटी विश्वरथ’ फिरत्या बसचे उद्घाटन
एसटी वाहतुकीत होत असलेल्या चांगल्या बदलात शासनाचा मोठा वाटा असून, त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. दरम्यान, वर्धापनदिनी अविरत सेवा बजावणाऱ्या काही कर्मचाऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यात वर्धा विभागातील एजाज खान इस्माईल खान पठाण (३३ वर्षे सेवा), आष्टी-वर्धा विभागातील विलास नाथे (३२ वर्षे सेवा), भंडारा विभागातील नईमुद्दिन सलीमुद्दिन काझी (३२ वर्षे सेवा), धुळे विभागातील भाऊसाहेब सूर्यवंशी (३१ वर्षे सेवा), लासलगाव, नाशिक विभागातील चौधरी मोहमूद (३१ वर्षे सेवा) यांना स्मृतिचिन्ह, धनादेश आणि त्यांच्या पत्नींना साड़ी देऊन गौरवण्यात आले. यासोबत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आगार व्यवस्थापकांनाही गौरवण्यात आले. दरम्यान, एसटीच्या कॉफी टेवल पुस्तकाचे अनावरण, २५ वर्षांपेक्षा जास्त सुरक्षित सेवा बजावणाऱ्या पाच चालकांचा सपत्नीक सत्कार, दूरदर्शी प्रणालीद्वारे राज्यातील विविध बसस्थानकांचे भूमिपूजन आणि एसटीच्या ७५ वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या ‘एसटी विश्वरथ’ या वातानुकूलित फिरत्या बसचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
महागाई भत्ता देण्याबाबत सकारात्मक
बस स्थानकावर खड्डे दिसता कामा नयेत प्रवासी मोठ्या संख्येने एसटी वाहतुकीवर अवलंबून असतात. मात्र बहुतांश बस स्थानकांत, आगारात खड्डे असल्याचे आढळून आले आहे. पावसाळा सुरू झाला आहे. आवश्यक त्याठिकाणी कॉक्रीटीकरण करा. प्रवाशांना खड्डयांचा आणि धुळीचा त्रास होता कामा नये, अशी सक्त ताकीद मुख्यमंत्र्यांनी एसटी महामंडळाला दिली. यासाठी शासनाकडून ५०० कोटी देण्यात येणार असून, पहिल्या टप्यात एमआयडीसीद्वारे २५० कोटींची तरतूद केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.काही महिन्यांपूर्वी झालेल्या एसटी संपकाळात एसटीचे विलीनीकरण आणि एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळावा, यासाठी कर्मचाऱ्यांनी जोर धरला. याबाबत तत्कालीन सरकारने कोणताही निर्णय दिलेला ■ नाही. दरम्यान, वर्धापनदिनी, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळावा, यासाठी आमचे सरकार सकारात्मक असून याबाबत अर्थमंत्र्यांशी चर्चा करून नियोजन करत योग्य निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
सदिच्छादूत म्हणून नेमले याचा आनंद आहे. एसटीशी संबंधित विनोद पाहत-ऐकत मोठे झालो. आजोळचा संपूर्ण प्रवास मी एसटीने केला. ‘देता आधार का करू अंधार’ ही एकांकिका १९९४ मध्ये आम्ही एसटी बस प्रवासात बसवली होती. एसटीवर गाणे नाही ही खंत. स्वच्छ सुंदर बस स्थानके ही चळवळ होणे गरजेचे.
– मकरंद अनासपुरे, अभिनेता, सदिच्छादूत,
एसटी महामंडळ एसटीचा ७५ वर्षांचा प्रवास प्रदीर्घ आहे. स्वातंत्र्य आणि एसटीचा अमृत महोत्सव म्हणजे दुग्धशर्करायोग. गाव तेथे एसटी अशी एसटीची ख्याती. ७ हजार 5 इलेक्ट्रिक वस लवकरच येणार असून, प्रवाशांना दर्जेदार सेवा मिळणार आहे. आपली गाडी समजून चालक-वाहक सेवा करत आहेत, हे अभिमानास्पद आहे. 5 एसटी तोट्यात जाऊ नये, याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे.
– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
या योजना लवकरच अंमलात येणार
-एसटीच्या चालक-वाहक यांना १० प्रकारच्या मोफत आरोग्य तपासण्या
-योजनेला स्व. आनंद दिघे यांचे नाव दिले जाणा
-परदेशी शिक्षणासाठी जाण्यास इच्छुक असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या
मुलांना बिनव्याजी १० लाख देणार