OBC Student Loan Scheme : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून ओबीसी विद्यार्थ्याकरिता देशांतर्गत शिक्षणासाठी 10 लाख, तर परदेशातील शिक्षणासाठी 20 लाख रुपये मर्यादेत कर्ज सुविधा राष्ट्रीयकृत बँकामार्फत उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेमध्ये उमेदवाराला बँकेमध्ये भरलेल्या व्याजाच्या 12 टक्के पर्यंत व्याज परतावा मिळणार आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
कोठे व कसा करावा अर्ज ?
या योजनेसाठी उमेदवाराचे वय हे 17 ते 30 वर्ष असावे, महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असल्याचा पुरावा, ओबीसी असल्याचा जातीचा दाखला, तहसिलदार यांचे 8 लाख रुपयापर्यतचा कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दाखला किंवा नॉन क्रीमेलेअरच्या मर्यादेत, बारावीमध्ये 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. उमेदवार व पालक यांचे आधार कार्ड, फोटो, आधारकार्ड बचत खाते पासबुकला लिंक असावे. वयाचा पुरावा, शैक्षणिक अभ्यासक्रमाबाबत आवश्यक कागदपत्रे तसेच शैक्षणिक खर्चाचा तपशिलासह महामंडळाच्या msobcfdc.org या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
कर्जाचा कालावधी किती?
राज्य-देशांतर्गत तसेच परदेशी अभ्यासक्रमामध्ये येणाऱ्या अभ्यासक्रमात आरोग्य विज्ञानमध्ये सर्व पदवी व पदव्युतर अभ्यासक्रम. अभियांत्रिकीमध्ये सर्व पदवी व पदव्युतर अभ्यासक्रम. व्यावसायिक व व्यवस्थापन अभ्यासक्रमात कृषि, अन्न प्रक्रिया व पशू विज्ञान, दुग्ध विज्ञानमधील सर्व संबंधित अभ्यासक्रमांचा समावेश राहणार आहे.व्याज परतावा व परतफेडीचा कालावधी हा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत बँकेने वितरित केलेल्या कर्ज रक्कमेवरील व्याजाची नियमित परतफेड केलेल्या उमेदवाराला केवळ व्याजाचा परतावा उमेदवाराच्या आधार लिंक बँक खात्यात महामंडळ वर्ग करेल. कर्जाचा कालावधी जास्तीत जास्त 5 वर्षे राहणार आहे.
लाभ घेण्याचे आवाहन
महाराष्ट्र सरकारच्या वतीने ओबीसी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ही योजना राबिण्यात येते. आजकाल बऱ्याच कुटूंबाची उच्च शिक्षण घेण्याची परिस्थिती नसते. अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना फायद्याची आहे. या योजनेत पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.