Telangana Election : देशभरातील विविध निवडणुकांमध्ये तब्बल २३६ वेळा पराभूत झाल्यानंतरही खचून न जाता तामिळनाडूचे रहिवासी व ‘इलेक्शन ‘किंग’ म्हणून प्रसिद्ध असलेले के. पद्मराजन (K Padmarajan)आता तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. तेलंगणा निवडणुकीत गजवेल मतदारसंघामधून अपक्षरूपाने त्यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरला आहे. निवडणूक लढण्याची त्यांची ही २३७ वी वेळ आहे. तेलंगणाच्या मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव गजवेलमधून निवडणूक लढत आहेत. पद्मराजन यांनी त्यांना आव्हान दिले आहे.
इयता आठवीपर्यंतचे शालेय शिक्षण आणि अन्नामलई ओपन युनिव्हर्सिटीतून एम. ए. (इतिहास) पदवीचे शिक्षण घेणारे पद्मराजन हे देशात ‘इलेक्शन किंग’ म्हणून लोकप्रिय आहेत. आता त्यांनी तेलंगणा विधानसभा निवडणुकीत उडी घेतली आहे. यापूर्वी तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून ते राष्ट्रपतीपदाची निवडणूक त्यांनी लढली आहे. आता तेलंगणा निवडणुकीत गजवेल • मतदारसंघातून २३७ व्यांदा पद्मराजन यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. विशेष बाब अशी की, टायरदुरुस्तीचे दुकान चालवणाऱ्या पद्मराजन यांनी सर्वप्रथम १९८८ मध्ये तामिळनाडू विधानसभा निवडणूक मेत्तूर मतदारसंघातून लढवली होती. त्यानंतर, त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व पी. व्ही. नरसिंह राव यांच्याविरोधात नशीब आजमावले. स्वतः होमओपॅथी डॉक्टर •असल्याचे सांगणारे ६० वर्षीय पद्मराजन यांनी आजतागायत निवडणूक लढण्याची महत्त्वाकांक्षा कायम ठेवली आहे.
आतापर्यंत निवडणुकीवर त्यांनी जवळपास १ कोटी रुपये खर्च केले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पद्मराजन यांनी केरळच्या वायनाडमधून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना आव्हान दिले. पण, या ठिकाणी त्यांचा दारुण पराभव झाला. काही पंचायत निवडणुकीत त्यांना एकही मत मिळाले नाही.पण, २०११ साली तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मेत्तूर मतदारसंघात त्यांना सर्वाधिक ६, २७३ मते मिळाल्याची नोंद आहे. दरम्यान, इलेक्शन किंग पद्मराजन यांनी आजपर्यंत कधीच आयकर रिटर्न भरला नाही. त्यांच्याकडे १ लाख १० हजार रुपयांची जंगम मालमत्ता असून ते वार्षिक १ लाख रुपये कमावतात, असे त्यांनी निवडणूक अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.