Foreign Language Careers
सध्याच्या जागतिकीकरणाच्या जमान्यात अवघे जग जवळ येत चालले आहे. संपूर्ण जग ही एक बाजारपेठ झाल्याने वस्तूंची आयात-निर्यात वाढली आहे तसेच विविध क्षेत्रात देशा-देशांमधील देवाण- घेवाणही वाढली आहे. या साऱ्यांमध्ये परदेशी भाषांचे शिक्षण घेणे महत्त्वाचे ठरत आहे. यापूर्वी टूर्स अँड ट्रॅव्हल्स क्षेत्रातील कंपन्यांना परदेशी भाषा शिकणाऱ्यांची आवश्यकता असायची. परंतु आता परदेशी भाषांचे शिक्षण एवढ्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. सध्याच्या ग्लोबलायझेशनच्या जमान्यात मल्टीनॅशनल कंपन्यांना परदेशी भाषा उत्तम येत असणाऱ्यांची आवश्यकता भासत आहे. परदेशी भाषा शिकून तुम्ही चांगले करिअर करू शकता.
उत्तम संधी उपलब्ध
मल्टीनॅशनल कंपन्यांबरोबरच आयटी, पब्लिशिंग, अँडव्हर्टायझिंग, एंटरटेनमेंट, मास कम्युनिकेशन, हॉस्पिटॅलिटी, एज्युकेशन अँड ट्रेनिंग, पब्लिक रिलेशन्स आदी क्षेत्रातही भाषा व्यावसायिकांची वाढती मागणी आहे. विशेषत: फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, जापनीज आदी भाषा शिकलेल्यांसाठी कारकिर्दीच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत.देशातील विविध विद्यापीठांमधून परदेशी भाषांमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.यात १२ वी नंतर तीन वर्षाची पदवी घेता येते. काही खासगी संस्था तसेच दूतावासांमध्येही परदेशी भाषांचे अभ्यासक्रम शिकवले जातात. यामध्ये बेसिक आणि अॅडव्हान्स या दोन्ही प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. दिल्ली विद्यापीठ तसेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्रवेश रीक्षेद्वारे बीए-भाषा यासाठी प्रवेश मिळू शकतो.
जगात मोठी मागणी
भारतातून दरवर्षी अनेक इंजिनिअर्स स्कॉलरशिपच्या सहाय्याने जर्मनीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी जातात. जर्मनीमध्ये इंग्रजी बोलणाऱ्यांची संख्या बरीच कमी आहे. त्यामुळे तिकडे जाऊन कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात कारकिर्द करायची असेल तर जर्मन भाषा शिकणे आवश्यक ठरते. सध्या चीनी, कोरियन तसेच जपानी भाषेचे उत्तम ज्ञान असणाऱ्यांना वाढती मागणी आहे.
भाषातज्ज्ञांना केवळ या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात मोठी मागणी आहे. आयटी कंपन्यांबरोबरच परदेशी भाषा शिक्षक म्हणूनही कारकिर्द करता येते. अनेक संस्थांमध्ये परदेशी भाषा शिकवणारे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या संस्थांमध्ये कोठेही परदेशी भाषा शिक्षक म्हणून संधी मिळू शकते.आता टेलिकॉन्फरसिंग तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग या तंत्राच्या सहाय्याने जगातील कोणत्याही ठिकाणच्या व्यक्तीबरोबर मिटिंग किंवा कॉन्फरन्स घेतली जाऊ शकते. त्यात दुभाषी म्हणून काम करण्यासाठी परदेशी भाषातज्ज्ञांची आवश्यकता भासते. यासाठी त्या त्या भाषेचे ज्ञान तसेच संभाषण कौशल्य हे गुण आवश्यक ठरतात.