Cabinet expansion
मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढील आठवड्यात सुरू होत असून, येत्या शनिवारपूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा उर्वरित विस्तार होण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपकडून ५ ते ६, शिंदे गटातून ४ जणांना तर अजित पवार गटातून तिघांना संधी मिळणार असल्याचे समजते. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतरच खातेवाटप होणार असून, अजित पवारांचा गट सत्तेत सामील झाल्याने नव्यानेच संपूर्ण खातेवाटप केले जाणार आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सर्व समाजघटकांना सत्तेत प्राधान्य दिले जाणार असल्याने मोठे फेरबदल संभावत आहेत.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या १७ जुलैपासून मुंबईत सुरू होत आहे. राज्यात रोजच नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील एक मोठा गट सत्तेत आणत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आता आठवडा उलटला तरी अजित पवार आणि त्यांच्यासोबत शपथ घेतलेल्या ८ मंत्र्यांना अद्याप खातेवाटप झालेले नाही. आता भारतीय जनता पक्ष तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतचे आमदार मंत्रीपदासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे पुढील तीन-चार दिवसांत कधीही मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील तसे संकेत दिले आहेत.
लवकरच मंत्रिमंडळ विस्तार
लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सर्व समाजघटकांना सामावून घेत सत्तेत संधी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपमधून संजय कुटे, माधुरी मिसाळ, राम शिंदे, प्रवीण दरेकर, किसन कथोरे, विजय देशमुख, जयकुमार रावळ आदींची नावे चर्चेत आहेत. भाजपकडून आता विधान परिषदेतील आमदारांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. जातीय समीकरण साधण्यासाठी धनगर समाजाचे नेते राम शिंदे तसेच सोलापूरमधील लिंगायत समाजाचे नेते विजय देशमुख यांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते. केंद्रीय मंत्रिमंडळातून नारायण राणेंना डच्चू मिळाल्यास नितेश राणेंना राज्यमंत्रीपद देण्याचे घाटत आहे. विधान परिषदेतील राम शिंदेंना मंत्रीपद दिल्यास अशा स्थितीत प्रवीण दरेकर यांना विधान परिषदेच्या सभापतीपदी संधी दिली जाऊ शकते.
शिंदे गटातून कोण मंत्री ?
उद्धव ठाकरे गटातून नुकत्याच शिंदे गटात गेलेल्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागणार आहे. त्यांच्याकडे आरोग्य किंवा महिला व बाल विकास मंत्रालय दिले जाऊ शकते. याशिवाय शिंदे गटातून बच्चू कडू, भरत गोगावले, संजय रायमूलकर यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. संजय शिरसाट यांना संधी द्यायची झाल्यास संभाजीनगर जिल्ह्यातीलएका मंत्र्याला मंत्रिमंडळातूनवगळावे लागणार आहे. त्यामुळे शिरसाटांना संधी मिळणार याची उत्सुकता आहे. तसेच मंत्री अब्दुल सत्तारांसह संदीपान भुमरे, तानाजी सावंत यांची खाती बदलण्याची शक्यता आहे.अजित पवार गटातून मकरंद पाटील (वाई), दत्ता भरणे, इंदापूर) तसेच मराठवाड्यातून एका मराठा चेहऱ्याला संधी दिली जाणार आहे. यात अजित पवारांचे निकटवर्तीय सतीश चव्हाण किंवा प्रकाश सोळंके यांची नावे चर्चेत आहेत. धनंजय मुंडे यांच्या रूपाने वंजारी समाजाला मंत्रिमंडळात स्थान दिल्याने सामाजिक समतोलासाठी मराठवाड्यातून मराठा चेहऱ्याला सामावून घेतले जाणार आहे.
नाराज आमदारांना महामंडळ
मागील आठवड्यातील ९ आमदारांच्या विस्तारात अजित पवारांनी मराठा, मुस्लिम, दलित, ओबीसी, आदिवासी, महिला अशा सर्व घटकांना सत्तेत संधी दिल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असलेल्या धनगर समाजातील दत्ता भरणे यांना विस्तारात संधी मिळू शकते. साताऱ्यातील जनता सध्या शरद पवारांसोबत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तेथील जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी अजित पवार साताऱ्यात एक मंत्रीपद देतील, अशी चर्चा आहे. यात राष्ट्रवादीतील बंडानंतर आठवडाभराने शनिवारी अजित पवार गटात सामील झालेल्या मकरंद पाटील यांची लॉटरी लागणार असल्याचे कळते. न मंत्रीपदावर संधी न देता येणाऱ्या ने नाराज आमदारांना महत्त्वाची महामंडळ देण्याचे नियोजन आहे.