Buldhana ncp news : बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा सि. राजा विधानसभा मतदार संघाचे आमदार, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अजित दादा यांच्या सोबत जाण्याचा निर्णय का घेतला, याबाबत देशोन्नती दैनिकात सविस्तर बातमी देण्यात आली आहे.
डॉ. राजेंद्र शिंगणे यांची भूमिका
माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर शरद पवारांसोबत कालपर्यंत ठाम असतांना आज शुक्रवारी अचानक जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या राजकारणाला त्यांनी जोरदार धक्का दिला. सर्वसामान्य शेतकऱ्यांची जिल्हा सहकारी बँक माझ्यासाठी खूप महत्त्वाची असून, त्यासाठी काहीही त्याग करायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले. अजीतदादांनी बुलढाणा जिल्हा बँक सुरळीत सुरु होण्यासाठी ३०० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देणार असल्याचे सांगितल्यामुळे, आपण आता अजित दादांसोबत जाण्याचा विचार करत असल्याचे ते म्हणाले.
बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे पुनर्वसन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपल्याला मदत करणार असतील तर आपण त्यांच्यासोबत जाऊ, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आपली भूमिका व्यक्त केली.
जिल्हा बँकेला ३०० कोटी रुपयांची मदत
प्राप्त माहितीनुसार, डॉ. राजेंद्र शिंगणे हे शरद पवारांचेच पाईक असल्याचे सांगत असताना.. त्या रात्री त्यांना अजीतदादांनी भेटायला बोलावले. जिल्हा बँकेसंदर्भात मदत करणार असल्याचे आश्वासन दादांनी त्यांना दिले, यासंदर्भात बोलताना डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले की, सध्या राज्याच्या राजकारणात जे काही सुरु आहे ते माझ्यासारख्या व्यक्तीला न पटण्यासारखे आहे. त्यामुळे आपण राजकारण सोडून शेती करण्याचीही भूमिका घेतली होती. परंतु राजकारण करतांना ते आपण सामान्य माणसासाठी करत असतो, त्यामुळे पटत नसल्यातरी राजकारणात काही भूमिका घ्याव्या लागतात. अजीतदादांना बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेविषयी माहिती आहे, ही बँक पुर्वपदावर आणावी ही त्यांचीही भूमिका आहे. त्यामुळे तुम्ही जर माझ्यासोबत आलातर जिल्हा बँकेला राज्य सरकारतर्फे ३०० कोटी रुपयांची मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
काँग्रेसवर केला हा आरोप
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतांना त्यांनी व जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या नेत्यांनी खूप त्रास दिला. असे सांगून त्यांनी आपली खदखद बाहेर काढली. ते म्हणाले की, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून आधी वडीलांनी व नंतर काही काळ आईनेसुध्दा कामकाज बघितले आहे. आपणही या बँकेचे खूप काळ अध्यक्ष होतो. दरम्यानच्या काळात ही जिल्हा सहकारी बँक अडचणीत आली होती. शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नव्हते. मात्र मध्यंतरी देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांनी या बँकेला मदत केली. सध्याही जिल्हा सहकारी बँकेच्या नाजूक परिस्थितीबाबतची ही गोष्ट अजितदादांना माहित होती.
या भूमिकेतून दादांसोबत
अजित पवारांनी मला बोलावून सांगितले की, तुम्ही माझ्यासोबत काम करण्याची भूमिका घेतली तर मी यात पुढाकार घेऊन तुम्हाला मदत करू शकतो. त्यांनी तशी भूमिका माझ्यासमोर मांडली, त्यामुळे मीसुद्धा अलिकडच्या काळात अजितदादांच्या बरोबर आपण राहायला पाहिजे, बँक सुधारली पाहिजे, बँक पुढे गेली पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला काही जरी त्याग करावा लागला तरी तो करण्याची माझी तयारी आहे, या भूमिकेतून दादांसोबत जाण्याचा माझा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान सुप्रियाताईंनी शिंगणे साहेबांना फोन करून मनधरणी केल्याचीही माहिती आहे.
मंत्रीपदासाठी नाही, जिल्हा बँकेसाठी
अजीतदादांकडून तुम्हाला मंत्रीपदाची ऑफर आहे का? या प्रश्नावर आ. डॉ. शिंगणे यांनी आपण मंत्रीपदासाठी नाहीतर जिल्हा बँकेसाठी दादांसोबत जावू शकतो. दोनदा कॅबीनेट तर अनेकदा राज्यमंत्रीपदाची शपथ आपण घेतली. राज्य सहकारी बँकेवर आपण गेलो. १० वर्षांपासून आपण विदर्भ मार्केटींग फेडरेशनचे अध्यक्षपद सांभाळत आहोत. या जिल्ह्यात सर्वांपेक्षा जास्त आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे ‘मोठा लाभार्थी मीच असल्याचे त्यांनी सांगून केवळ अन केवळ जिल्हा बँक वाचविण्यासाठी आपण अजीतदादांसोबत जाण्याचा विचार केल्याचे ते म्हणाले.
साहेबांच्या भूमिकेमुळे पदाधिकाऱ्यांची सैरभैरता
साहेबांमुळे साहेबांसोबत राहण्याचा निर्णय जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला होता. पण आता साहेबच साहेबांना सोडत असतीलतर, जायचे कुठे? हा प्रश्न त्यांच्यापुढे राहीला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नाझेर काझी यांच्याशी संपर्क साधला असता शिंगणे साहेबांना प्रत्यक्ष भेटून भूमिका ठरवू, असे ते म्हणाले. सौ. रेखाताई खेडेकर यांनी आपण अजूनतरी पवार साहेबांसोबतच असल्याचे सांगून, संभ्रमीत करणारी प्रतिक्रिया दिली. तर अनेक पदाधिकारी अजून वेटींगवर असल्याचे चित्र राष्ट्रवादी वर्तुळात बघायला मिळत आहे.
दादांसोबत जाणे जवळपास निश्चित
परवा झालेल्या राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडील बैठकीला आमदार डॉ. शिंगणे यांच्यासह बुलढाणा जिल्ह्यातून माजी आ. रेखाताई खेडेकर, प्रसेनजीत पाटील, पांडुरंगदादा पाटील, नरेश शेळके, संतोष रायपुरे, साहेबराव सरदार, सुमित सरदार, अनिल बावस्कर, डी. एस. लहाने आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते. यामुळे अजितदादांच्या चंडखोरीचा जिल्ह्यात फारसा परिणाम होणार नाही, असे राजकीय चित्र होते. प्रसारमाध्यमांशी बोलतानाही डॉ. शिंगणे यांनी मला दादाची ऑफर होती, पण ती विनम्रपणे नाकारली. मी साहेबांसोबतच राहणार आहे’, असे स्पष्ट केले होते. परंतु, डॉ. शिंगणे हे दादांसोबत जाणे जवळपास निश्चित झाले आहे. तसे झाले तर बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक मोठा गट अजित पवारांच्या गोटात जावू शकतो.