Prime Minister Narendra Modi’s visit to America
पुढील आठवड्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारत-अमेरिकेची मैत्री सध्या जगभर चर्चेत आहेत. भारताचा अमेरिकेशी असलेला व्यापार फायद्यात आहेत. जशी भारताला अमेरिकेची आवश्यकता , त्याही पेक्षा अधिक गरज अमेरिकेला भारताची असल्याचे बोलल्या जाते. त्यामुळे तर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणतात, की भारतापेक्षा चांगला भागीदार कोणीच असू शकत नाही. मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे आहे. बायडेन अध्यक्ष झाल्यापासून भारताचे अमेरिकेसोबतचे द्विपक्षीय संबंध दृढ होत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेकडून भारताबाबत सातत्याने चांगली वक्तव्ये येत आहेत. व्हाईट हाऊस, पेंटागॉन, अमेरिकन संरक्षण विभागाचे मुख्यालय आणि इतर सर्व विभागांकडून अशी विधाने दररोज येत आहेत, ज्यातून अमेरिकेसाठी भारताचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे. मोदी अमेरिकेत जाण्याअगोदरच ड्रोन खरेदीचा विषय चर्चेत आला आहे. व्हाईट हाऊसच्या भूमिकेवरून हे स्पष्ट होते, की बहुध्रुवीय जगात अमेरिकेसाठी भारताचे महत्त्व पूर्वीपेक्षा अनेक पटींनी वाढले आहे. बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारताच्या सामर्थ्याचा आणि क्षमतेचा थेट फायदा आपल्यालाही मिळावा, अशी अमेरिकेची इच्छा आहे. बायडेन २० जानेवारी २०२० रोजी अमेरिकेचे अध्यक्ष झाले. या सुमारे अडीच वर्षात केवळ दोनच जागतिक नेत्यांना बायडेन यांनी अमेरिकेच्या राज्यभेटीवर आमंत्रित केले होते. यादरम्यान केवळ फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक योल हेच अमेरिकेच्या सरकारी दौऱ्यावर गेले आहेत.
दोन्ही देशांतील संबंधांना महत्त्व
आता बायडेन यांनी मोदी यांना सरकारी दौऱ्यावर बोलावले आहे. मोदी हे तिसरे राष्ट्रप्रमुख किंवा सरकार प्रमुख असतील, जे बायडेन यांच्या कार्यकाळात अमेरिकेला राज्य भेट देणार आहेत. मोदी २१ ते २४ जून दरम्यान अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये त्यांच्यासाठी राज्य मेजवानीचे आयोजन केले जाईल. यासोबतच मोदी २२ जून रोजी अमेरिकन संसदेतील ‘काँग्रेस’ला संबोधित करणार आहेत. मोदी यांना अधिकृत दौऱ्यावर बोलावण्यामागे बायडेन प्रशासनाचा हेतू काय आहे, हेही या विधानावरून दिसून येते. ही भेट भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय परराष्ट्र धोरणाच्या दृष्टिष्कोनातून, जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेशी भारताच्या संबंधांच्या नव्या अध्यायाची ही सुरुवात आहे. मोदी हे मे २०१४ पासून देशाचे पंतप्रधान आहेत. दरम्यान, त्यांनी २०१४, २०१५, २०१६ (दोनदा), २०१७, २०१९ आणि २०२१ मध्ये अमेरिकेला भेट दिली आहे; पण यापैकी एकाही भेटीला राज्यभेटीचा दर्जा नव्हता. यापूर्वी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग २३ ते २५ नोव्हेंबर २००९ या कालावधीत अमेरिकेच्या राज्य दौऱ्यावर गेले होते. मोदी हे तिसरे भारतीय पंतप्रधान आहेत, ज्यांना ही संधी मिळत आहे. यावरून बायडेन दोन्ही देशांतील संबंधांना दिलेले महत्त्व दाखवून देतात.
बायडेन यांना हवेत भारत सोबत हवा
२१व्या शतकात अमेरिका-भारत भागीदारी जागतिक व्यवस्थेच्या समतोलासाठी खूप महत्त्वाची आहे. आपण आर्थिक घटकानुसार विचार केला तर अमेरिका हा भारताचा गेल्या दोन वर्षांपासून सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. जानेवारी २०१८ पासून अमेरिकेचे चीनसोबतचे व्यापारी संबंध सतत बिघडत आहेत. त्याचवेळी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी वस्तूंच्या आयातीवर शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर चीनकडूनही दरवाढ करण्यात आली आणि हा ट्रेंड वाढतच गेला. एक प्रकारे दोन्ही देश व्यापार युद्धात अडकले आहेत. तणाव असूनही, २०२२ मध्ये अमेरिका आणि चीनमध्ये सुमारे ६९० अब्ज डॉलरचा विक्रमी व्यापार झाला. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेशी संबंधित सीमावादामुळे भारताचा चीनसोबतचा तणावही शिगेला पोहोचला आहे. असे असूनही भारत आणि चीनमधील व्यापार सातत्याने वाढत आहे. आयातीच्या बाबतीत भारताचे चीनवरचे अवलंबित्व मोठ्या प्रमाणात आहे. चीनसोबतचा राजनैतिक आणि व्यापारी तणाव लक्षात घेऊन बायडेन यांना भारतासोबतचे संबंध अधिक दृढ करायचे आहेत.
भागीदारी दोन्ही देशांच्या हिताची
अमेरिका आणि भारत दोघेही व्यापाराच्या मुद्द्यावर चीनला पर्याय शोधत आहेत. अशा परिस्थितीत भारत आणि अमेरिका यांच्यातील मजबूत भागीदारी दोन्ही देशांच्या हिताची आहे. आता भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असल्याने आणि मोठ्या बाजारपेठेसह भारत आर्थिकदृष्ट्या खूप मजबूतपणे पुढे जात आहे. सध्या भारताचा अमेरिकेसोबतचा व्यापार भारताच्या बाजूने आहे. याउलट चीनबाबत नेमके उलटे आहे. भारत चीनला फारच कमी निर्यात करतो आणि मोठ्या प्रमाणात आयात करतो. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीन सातत्याने विस्तारवादी आणि आक्रमक भूमिका घेत आहे. हा समतोल साधण्यासाठी अमेरिका आणि भारत क्वाड आणि इतर जागतिक व्यासपीठांवर जवळून सहकार्य करत आहेत. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे अमेरिकेचे भारताकडे लक्ष वाढले आहे. हे युद्ध सुरू झाल्यानंतर चीन आणि रशिया यांच्यात ज्या प्रकारे जवळीक वाढली आहे, तेही अमेरिकेसाठी चिंतेचे कारण आहे. भारताचे रशियाशी संबंध प्रदीर्घ काळापासून चांगले आहेत, हे अमेरिकेला माहीत आहे. अमेरिकेला हेही माहीत आहे, की भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्याही गटात सामील होण्याचे नाही आणि त्यामुळे भारत ‘नाटो’मध्ये सामील होण्याची शक्यता नाही. रशिया आणि चीनशी अमेरिकेचा संघर्ष सातत्याने वाढत आहे. रशियासोबत भारताचे संरक्षण सहकार्यही खूप मोठे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रशिया हा भारताला सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठा करणारा देश आहे. या सर्व बाबी पाहता अमेरिकेच्या दृष्टीने भारत हा एकमेव देश आहे, जो भविष्यात रशियावर दबाव आणण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकतो.
मोदी यांचा दौरा व्यूहात्मक
अलीकडेच इराण आणि सौदी अरेबिया यांच्यातील राजनैतिक संबंध पुनर्स्थापित करण्यात चीनने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सौदी अरेबियाचे प्राधान्य बदलत आहे आणि चीनचा दृष्टिकोन अरब देशांवर प्रभाव वाढवण्याचा आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी अरब देशांशी संबंध वाढवण्यासाठी खूप काम केले आहे. या वर्षी मे महिन्यात भारत, अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी सौदी अरेबियाचे प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांच्याशी बैठक घेतली होती. अरब देशांमध्ये चीनचा वाढता प्रभाव रोखणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. आता मोदींचा पहिला राज्य दौरा होत आहे. यासोबतच भारत सप्टेंबरमध्ये नवी दिल्लीत जी २० ची वार्षिक शिखर परिषद आयोजित करत आहे. या बैठकीला बायडेन भारत दौऱ्यावर येणार आहेत. अध्यक्ष झाल्यानंतरच्या या पहिल्या भारत भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंधांना अनेक नवे आयाम मिळतील, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या पहिल्या भारत भेटीदरम्यान मोदी यांच्याशी जागतिक समस्यांशी संबंधित मुद्द्यांवरही चर्चा केली जाऊ शकते. मोदी यांच्या २१ ते २४ जून दरम्यानच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी अनेक संरक्षण सौद्यांवर चर्चा होऊ शकते. मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी संरक्षण सौद्यांना मंजुरी देण्यासाठी अमेरिकेकडून दबाव निर्माण केला जात आहे. त्यात सध्या सर्वाधिक फोकस प्रिडेटर हाय-अल्टीट्यूड लाँग-एन्ड्युरन्स ड्रोनवर आहे. अमेरिकन ड्रोन एमक्यू-९ बी सी गार्डियन हे अमेरिकन संरक्षण कंपनी जनरल अॅटोमिक्सने बनवले आहेत. या ड्रोनचे वैशिष्टय़ म्हणजे ते अगदी अचूकपणे लक्ष्य वेधतात आणि शत्रूला कळेपर्यंत त्याने आपले काम केलेले असते. या ड्रोनमध्ये अशी क्षेपणास्त्रे बसवण्यात आली आहेत, ज्यामुळे कोणतेही छोटे लक्ष्य नष्ट केले जाऊ शकते. याशिवाय हे ड्रोन उंचावरील भागात निगराणी ठेवण्यासाठीही अतिशय प्रभावी आहे. एकंदरित मोदी यांचा दौरा व्यूहात्मक भागीदारी आणि व्यापार उदीमासाठी उपयुक्त ठरणार आहे.