Bhon : बुलढाणा जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात पूर्णा नदीकाठी आढळलेल्या पुरातत्व बुद्ध स्तूप स्तळाच्या संवर्धन आणि जतनाचा मार्ग मोकळा झाला आहे. जल संपदा विभागाने त्याअनुषंगाने मोठे पाऊल टाकले आहे. जलसंपदा विभाग जिगाव प्रकल्प शेगाव कडून नुकतीच या पुरातत्व स्तूप स्थळाचे संवर्धन आणि जतन करण्याचे उद्देशाने सर्वेक्षण आणि भुस्तर अन्वेषण करणे, नकाशे तयार करणे, त्याचा प्रस्ताव तयार करणे आणि वेटिंग करण्यासाठी दरपत्रक मागविण्यात आले आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पुरातन भारतीय संस्कृती उजागर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
काय होती मागणी
दोन दशकापासून संग्रामपूर तालुक्यातील भोन येथील भूमिगत बुद्ध स्तूपाच्या उत्खननाचे काम लवकर सुरू करावे अशी राज्यभरातील इतिहास प्रेमींची मागणी होती. डेक्कन कॉलेज पुणे येथील डॉ. भास्कर देवतारे यांच्या नेतृत्वातील एका टीमने संग्रामपूर तालुक्यातील भोन येथे उत्खनन करून सातवाहन पूर्व काळातील बौद्ध स्तूप या ठिकाणी शोधून काढला आहे. त्यानंतर तब्बल 2300 वर्षापूर्वीचा भारतीय संस्कृतीचा हा अनमोल ठेवा वाचावा यासाठी जलसंपदा विभाग, विविध सामाजिक संघटना आणि भारतीय स्तूप व संवर्धन समिती प्रयत्नरत आहे. या सर्वांच्या प्रयत्नांना आता यश मिळत असल्याचा पाहायला मिळत आहे.
ऐतिहासिक वारसा संवर्धन
जलसंपदा विभागाच्या जिगाव प्रकल्पाच्या बॅकवॉटर मध्ये बुडीत क्षेत्रात येणाऱ्या या भोन गावामधील ऐतिहासिक वारसा संवर्धन आणि जतन करण्याकरता गेल्या दोन दशकांपासून विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते, यामध्ये तब्बल साडेतीनशे एकर जमिनीला संरक्षक भिंत तयार करून 2024 मध्ये जिगाव प्रकल्पातील पहिला टप्प्यातील पाणी अडवण्याचा निर्धार जलसंपदा विभागाकडून करण्यात आला आहे. हा निर्धार पूर्णत्वास नेण्यासाठी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीराम हजारे हे सातत्याने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या पुढाकारातून जिगाव प्रकल्प पूर्णत्वास जात असल्याच पाहायला मिळतंय.
संशोधनाला मोठ्या प्रमाणात वाव
नुकताच राज्य सरकारने जिगाव प्रकल्पातील उर्वरित कामांसाठी तब्बल 1750 कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे जिगाव प्रकल्पातील कामांना गती प्राप्त होणार आहे. जिगाव प्रकल्पाने बुलढाणा, अकोला जिल्ह्यातील शेतकरी समृद्ध होणार आहे. शिवाय विदर्भाला एक मोठा ऐतिहासिक वारसा प्राप्त होणार आहे. यातून पश्चिम विदर्भात शेगाव पाठोपाठ पर्यटन आणि संशोधनाला मोठ्या प्रमाणात वाव मिळणार आहे.