Chain Pulling : रेल्वेमध्ये आपण नेहमी पाहतो की, रेल्वेमध्ये आपत्कालीन परिस्थितीत गाडी थांबविण्यासाठी चेन असते. मात्र विनाकारण जर तुम्ही ही चेन ओढत असला तर नक्कीच तुम्ही अडचणीत येणार आहात. अशी चूक करणाऱ्या प्रवाश्यांच्या विरोधात रेल्वेने काय कारवाई केली तसंच कोणत्या परिस्थितीत चेन खेचता येते याबद्दल सविस्तर माहिती आपण या जाणून घेणार आहोत.
७११ रेल्वे प्रवाशांवर कारवाई
रेल्वेत चांगला झाला पाहिजे तसेच प्रवाश्याना संकटकाळी मदत मिळवता यावी, साठी विविध प्रकारच्या सुविधा असतात. रेल्वे चालकाला रेल्वे थांबविण्याचा संकेत देण्यासाठी प्रत्येक बोगीमध्ये एक चेन दिलेली असते. ती केव्हा खेचली पाहिजे याबाबत विशेष असे नियम आहेत. वारंवार आवाहन करूनही प्रवाशांकडून रेल्वेच्या नियमांना केराची टोपली दाखवण्यात येते. रेल्वे रूळ ओलांडण्याच्या घटनांसोबत धावत्या ट्रेनमध्ये विविध कारणांनी चेन खेचण्याच्या घटना घडत आहेत. मध्य रेल्वेवर गेल्या महिनाभरात ९४१ चेन पुलिंगच्या घटना घडल्या असून, ७११ रेल्वे प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून अडीच लाखांपेक्षा जास्त दंड मध्य रेल्वेकडून आकारण्यात आला आहे.
वक्तशीरपणाला बाधा
रेल्वे प्रवासादरम्यान आपत्कालीन घटना घडल्यास सुरक्षेखातर डब्यांमध्ये अलार्म चेन सुविधा रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येते. यामध्ये रेल्वेने उपनगरीय आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये आपत्कालीन वापराकरता अलार्म चेन खेचण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला असताना उशिरा पोहोचणे, मधल्याच स्थानकांवर उतरणे, चढणे इ. क्षुल्लक कारणांसाठी प्रवासी अलार्म चेन खेचत असल्याचे समोर आले आहे. चेन खेचण्याच्या प्रकारामुळे बहुतांश वेळेस मागून येणाऱ्या इतर गाड्यांवर त्याचा परिणाम होतो. अशातच मुंबई विभागासारख्या उपनगरीय मार्गावर मेल-एक्स्प्रेस, लोकल सर्वसाधारण वेळेसही उशिराने धावत असल्याने असा प्रकार घडल्यास गाड्यांच्या वक्तशीरपणाला बाधा येते.
चेन पुलिंग न करण्याचे आवाहन
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने शेकडो उन्हाळी विशेष गाड्या सोडल्या आहेत. त्यामुळे चेन पुलिंगच्या घटनाही वाढल्या आहेत. मे २०२३ या एका महिन्यात मध्य रेल्वेवर ९४१ अलार्म चेन पुलिंगच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये मध्य रेल्वेने भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४१ अन्वये एकूण ७११ प्रवाशांवर कारवाई केली आहे. या कारवाईत त्यांच्याकडून २ लाख ७१ हजार २०५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अनावश्यक कारणांसाठी अलार्म चेन पुलिंग न करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने प्रवाशांना केले आहे.
कधी चेन ओढता येते
जर एखादा सहप्रवासी, ज्याचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे किंवा लहान मूल चुकले आणि ट्रेन सुरू झाल्यास , चालत्या ट्रेनला आग लागली तर वृद्ध किंवा अपंग व्यक्तीला ट्रेनमध्ये चढण्यासाठी वेळ लागत असेल आणि तितक्यात ट्रेन सुरू होत असल्यास , एखाद्या प्रवाशाला हृदयविकाराचा झटकासारख्या घटना घडल्यास, ट्रेनमध्ये चोरी किंवा दरोड्याची घटना झाल्यास चेन ओढता येते.